‘मुंबई कलेक्टिव्ह’चे दुसरे आवर्तन

गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही ‘मुंबई कलेक्टिव्ह’मधून समकालीन चर्चाविषय हाताळले जाणार आहेत.

गतवर्षीच्या मार्चमध्ये पार पडलेल्या ‘मुंबई कलेक्टिव्ह’ या चर्चासत्राने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याच्या दुसऱ्या आवर्तनाचे आयोजन मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पुढील आठवडय़ात- ९ व १० डिसेंबर रोजी- करण्यात आले आहे. बातमी त्याविषयीच आहे.

गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही ‘मुंबई कलेक्टिव्ह’मधून समकालीन चर्चाविषय हाताळले जाणार आहेत. या दोन दिवसीय चर्चासत्रात चर्चेसाठी डझनाहून अधिक विषय आणि तीसहून अधिक वक्त्यांचा समावेश आहे. त्यात तीन विशेष व्याख्यानांचे यंदाच्या कलेक्टिव्हमध्ये आयोजन करण्यात आले आहे. ‘गांधींचे मारेकरी कोण?’ हा त्यातील एका व्याख्यानाचा विषय. त्यावर मांडणी करणार आहेत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ए. जी. नूरानी. तर गुजरातच्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर गुजरातच्या विकास प्रारूपावर ज्येष्ठ समाजशास्त्री प्रा. घनश्याम शाह यांचे व्याख्यान होणार आहे. ‘गुजरातच्या विकास प्रारूपाचे मिथक’ हा प्रा. शाह यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. तर तिसरे व्याख्यान हे काश्मीरमधील साम्यवादी नेते मो. युसूफ तारीगामी यांचे असून ते काश्मीरप्रश्नावर बोलणार आहेत.

या तीन व्याख्यानांव्यतिरिक्त गेल्या वर्षभरातील आर्थिक-सामाजिक घडामोडींवरही चर्चासत्रात मांडणी केली जाणार आहे. त्यात निश्चलनीकरण आणि वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी हे विषय साहजिकच असणार आहेत, मात्र त्याबरोबरच शेती व शेतकऱ्यांसमोरचे प्रश्न हाही एका सत्राचा विषय आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावरही  एका सत्रात चर्चा केली जाणार आहे.

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्वातंत्र्य चळवळ’, ‘हिंदुत्ववादी प्रवाह आणि राजकारण’, ‘हिंदुत्ववाद आणि बुद्धिवादी इतिहासलेखन’ या विषयांवरील परिसंवादांचेही आयोजन यंदाच्या कलेक्टिव्हमध्ये करण्यात आले आहे. याशिवाय अभिव्यक्तिस्वातंत्र्य हाही यंदाच्या चर्चासत्रातील महत्त्वाचा चर्चाविषय आहे. ज्येष्ठ कादंबरीकार किरण नगरकर, अभिनेत्री-दिग्दर्शिका नंदिता दास, विद्यार्थी नेता कन्हैया कुमार हे त्यावरील परिसंवादात सहभागी होणार आहेत. तसेच ऑल इंडिया सफाई कर्मचारी आंदोलनाचे बेझवाडा विल्सन हे स्वच्छ भारत अभियान व जातव्यवस्था यांच्यातील परस्परसंबंधांवर, तर कायदेतज्ज्ञ मिहिर देसाई हे ‘खासगीपणाचा अधिकार’ या विषयावर मांडणी करणार आहेत.

यंदाच्या कलेक्टिव्हमध्ये रावसाहेब कसबे, प्रज्ञा दया पवार, अशोक ढवळे, संभाजी भगत, अजित नवले यांच्याबरोबरच हर्ष मँडर, पी. साईनाथ, सिद्धार्थ वरदराजन, प्रकाश करात, सत्यजीत रथ आदी वक्तेही सहभागी होणार आहेत.

Source – Loksatta